ही मुलाखत रिजनल सपोर्ट मेकॅनिझम EECA प्रकल्पाचा भाग म्हणून डिजिटल स्पार्क अनुदान योजनेतील काही अनुदानप्राप्त संस्थांच्या कामावर प्रकाश टाकणाऱ्या मालिकेचा भाग आहे. ग्लोबल साउथचा समावेश असलेल्या डिजिटल डेमोक्रसी इनिशिएटिव्ह (DDI) अंतर्गत, CIVICUSच्या भागीदारीत मेटामॉर्फोसिस फाउंडेशन आणि टेकसूप यांनी हा प्रकल्प राबवला आहे. मजकूर सामायिक करण्याच्या कराराचा भाग म्हणून ही मुलाखत ग्लोबल व्हॉइसेसवर प्रकाशित केली जात आहे.

युक्रेनमधील युद्धामुळे तरुणांसमोर आणि सार्वजनिक जीवन व लोकशाही प्रक्रियांमधील त्यांच्या सहभागासमोर असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आहेत. विस्थापन आणि चुकीची माहिती यांसोबतच राजकीय सहभाग, आर्थिक उपक्रम आणि माहिती मिळवण्याच्या संधीही कमी झाल्या आहेत. त्याच वेळी, राजकीय निर्णयांमध्ये योगदान देण्यासाठी आणि आपल्या समुदायांचे भवितव्य घडवण्यासाठी तरुणांना अजूनही काही मार्ग उपलब्ध आहेत.

युद्ध सुरू असूनही लोक याचिका दाखल करू शकतात, सार्वजनिक सल्लामसलतींमध्ये सहभागी होऊ शकतात किंवा आपल्या गरजांसाठी ऑनलाइन पाठपुरावा करू शकतात; मात्र अशा संधींबद्दल पुरेशी जागरूकता नाही. शिवाय, विस्थापित व्यक्ती, अल्पसंख्याक आणि ग्रामीण समुदायांसह असुरक्षित गटांना आपलेही मत महत्त्वाचे आहे हे माहीत असले, तरी ते मांडण्याचा मार्ग शोधताना त्यांना अडचणी येतात.

2026 मध्ये beYOUnd या स्थानिक बिगरसरकारी संस्थेने असुरक्षित गटांतील तरुणांना डिजिटल लोकशाहीच्या या नव्या युगात आपला आवाज मांडण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने एक प्रकल्प राबवला. या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ग्लोबल व्हॉइसेसने beYOUndच्या अध्यक्षा येव्हेनिया होलोव्हेंको यांची ईमेलद्वारे मुलाखत घेतली. स्पष्टता आणि संक्षिप्ततेसाठी मुलाखतीचे संपादन करण्यात आले आहे.

ग्लोबल व्हॉइसेस (GV): कृपया आपल्या संस्थेबद्दल आणि डिजिटल स्पार्क्स प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय तुम्ही का घेतला, याबद्दल सांगा.

येव्हेनिया होलोव्हेंको (YH): beYOUnd ही युक्रेनमधील तरुणांच्या नेतृत्वाखाली चालणारी बिगरसरकारी संस्था आहे. तिची नोंदणी ऑक्टोबर 2025 मध्ये झाली; मात्र त्याआधीपासूनच आम्ही एक संघ म्हणून काम करत होतो. असुरक्षित तरुणांचा—विशेषतः अंतर्गत विस्थापित व्यक्ती आणि कठीण सामाजिक व आर्थिक परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या तरुणांचा—समाजात समावेश, आत्मविकास आणि नागरी जीवनातील सहभाग वाढवणे, हे आमचे ध्येय आहे.

आमच्या नावातून आमचे तत्त्वज्ञान दिसते: सुरुवात तुमच्यापासून होते; ती त्याहीपलीकडे जाते! आम्ही ज्यांच्यासोबत काम करतो, त्या तरुणांसारख्याच अडचणी अनुभवलेल्या तरुणांचा आमच्या संघात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक कामाकडे कसे पाहतो, हे ठरते.

डिजिटल लोकशाही आणि नागरी सहभागासाठीची मोकळी जागा याच क्षेत्रांत युक्रेनमधील तरुणांना सध्या मदतीची गरज आहे, म्हणून आम्ही डिजिटल स्पार्क्स उपक्रमात सहभागी झालो. युद्धकाळातील तग धरण्याच्या क्षमतेपासून सुरक्षित आणि माहितीपूर्ण ऑनलाइन सहभाग वेगळा करता येत नाही. हे आमच्या ध्येयाशीही पूर्णपणे जुळत होते.

GV: तुमच्या समुदायातील कोणत्या समस्येमुळे किंवा आव्हानामुळे तुम्हाला हा प्रकल्प हाती घ्यावासा वाटला?

YH: संपर्कात राहण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि नागरीदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी युद्धामुळे अनेक तरुण युक्रेनियन नागरिकांना, विशेषतः अंतर्गत विस्थापित व्यक्तींना (IDPs), डिजिटल माध्यमांकडे वळावे लागले. मात्र हे सुरक्षितपणे करण्यासाठी लागणारी साधने अनेकदा त्यांच्याकडे नव्हती.

आम्हाला एक उणीव दिसली: तरुण माहितीचा वापर करत होते आणि ऑनलाइन सहभागीही होत होते; पण त्यांच्याकडे माध्यम साक्षरता, डिजिटल सुरक्षेची जाणीव किंवा आपल्या आवाजामुळे काही घडू शकते हा आत्मविश्वास नव्हता.

विस्थापित आणि उपेक्षित तरुणांमध्ये डिजिटल सुरक्षेची आणि नागरी सहभागाची व्यावहारिक कौशल्ये विकसित करून ही उणीव भरून काढायची होती. युक्रेनमधील तरुणांच्या सहभागातून डिजिटल लोकशाहीबद्दल जागरूकता कशी वाढवता येईल, याविषयीच्या कल्पना मांडण्याची संधी त्यांना द्यायची होती.

GV: या प्रकल्पातील सहभागादरम्यान तुमच्या संस्थेने कोणते महत्त्वाचे बदल केले किंवा कोणते उपक्रम राबवले?

YH: “डिजिटल युगातील लोकशाहीचे आवाज” या प्रकल्पांतर्गत आम्ही डिजिटल सुरक्षा, ई-सहभाग आणि दिशाभूल करणारी माहिती या विषयांवर जनजागृती मोहीम राबवली. तिला 8,500 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.

शैक्षणिक उपक्रमांतर्गत आम्ही डिजिटल लोकशाही, माध्यम साक्षरता, नागरी कृतीचे नियोजन आणि सायबर सुरक्षा या विषयांवर 3 वेबिनार आणि 3 कार्यशाळा घेतल्या. त्यांत 100हून अधिक जण सहभागी झाले.

राजधानी कीवमध्ये आम्ही प्रत्यक्ष भेटीचा नेटवर्किंग कार्यक्रमही आयोजित केला. त्यात 27 सहभागी या विषयांवर एकमेकांशी जोडण्यासाठी समोरासमोर भेटले. ऑनलाइन शिक्षणाला प्रत्यक्ष नाती आणि विचारांच्या देवाणघेवाणीची जोड मिळाली.

ऑनलाइन पोहोच आणि प्रत्यक्ष भेटीतून समुदाय उभारणी यांची सांगड घालणाऱ्या या सर्व उपक्रमांमुळे तरुणांना नव्याने मिळवलेले ज्ञान वापरण्यासाठी आवश्यक माहिती आणि संपर्कांचे जाळे, दोन्ही मिळाले.

GV: या प्रकल्पातील तुमच्या सहभागाचा तुमच्या संस्थेच्या लाभार्थ्यांवर आणि तुम्ही सेवा देत असलेल्या समुदायावर काय परिणाम झाला? कृपया उदाहरणे द्या.

YH: “लोकशाहीचे आवाज” या प्रकल्पामुळे आमच्या लाभार्थ्यांचा समुदायातील स्वतःच्या स्थानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. एका सहभागीने सांगितले, “माझ्या समुदायाशी जोडून घेण्यासाठी आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी होण्यासाठी वापरता येतील अशी नवी डिजिटल साधने मला सापडली.”

इतरांच्या मते, स्वतःच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण कसे करायचे आणि दैनंदिन जीवनात डिजिटल सेवा सुरक्षितपणे कशा वापरायच्या, हे शिकणे हा सर्वांत मोलाचा भाग होता.

पाठपुरावा करून एखाद्या मुद्द्यासाठी समर्थन मिळवणे आणि व्यापक नागरी कृती यांतील फरक अखेर समजल्याचे अनेकांनी अधोरेखित केले. तसेच स्वतःच्या उपक्रमासाठी ठोस योजना कशी तयार करायची, हेही त्यांना समजले. संघभावनेतून काम करताना ही कौशल्ये प्रत्यक्षात उतरली.

दुसऱ्या एका सहभागीने सांगितले, “समस्या नेमकी मांडणे, तिची कारणे शोधणे आणि ती सोडवण्यासाठी ठोस पावले आखणे मी शिकलो. एखाद्या मुद्द्यासाठी समर्थन मिळवण्याचा पाठपुरावा म्हणजे काय आणि त्यातून समुदायात सकारात्मक बदल कसा घडू शकतो, हेही मला अधिक चांगले समजले.”

यामुळे स्थानिक पातळीवरील बदलावर प्रभाव टाकण्याच्या स्वतःच्या क्षमतेकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला.

GV: या प्रकल्पातील सहभागामुळे डिजिटल लोकशाही आणि नागरी सहभागासाठीची मोकळी जागा यांविषयीचे तुमचे स्वतःचे ज्ञान, जागरूकता आणि अनुभव कसे बदलले?

YH: या प्रकल्पाचे नेतृत्व केल्यामुळे डिजिटल सुरक्षा आणि लोकशाहीतील सहभाग यांचा किती जवळचा संबंध आहे, याची आमची समज अधिक सखोल झाली. ऑनलाइन नागरी जीवनात तरुणांना अर्थपूर्णरीत्या सहभागी करून घेण्याआधी त्यांना त्या डिजिटल अवकाशात सुरक्षितपणे वावरण्याची साधने देणे आवश्यक आहे.

डिजिटल सुरक्षा आणि नागरी सहभाग क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत काम केल्यामुळे आता आम्ही वापरत असलेल्या व्यावहारिक साधनांविषयीची आमची समज वाढली. beYOUndच्या कार्यक्रमांचा विचार करण्याची आमची पद्धतही व्यापक झाली.

क्षमता उभारणीकडे अधिक रचनात्मक पद्धतीने पाहण्यासही यामुळे आम्हाला चालना मिळाली: लाभार्थ्यांना आम्ही काय शिकवतो एवढेच नव्हे, तर प्रत्येक प्रकल्पापुरता विचार न करता दीर्घकाळासाठी आमच्या संस्थेची स्वतःची तग धरण्याची क्षमता कशी उभारतो, हेही महत्त्वाचे आहे.

GV: या प्रकल्पातून मिळालेले कोणते धडे आणि अनुभव तुम्हाला सर्वांत मोलाचे वाटतात?

YH: व्यावहारिक, प्रत्यक्ष कृतीवर आधारित मजकुराला खऱ्याखुऱ्या संवादाची—वेबिनार, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष नेटवर्किंगची—जोड दिल्यास, कोणत्याही एका माध्यमाचा स्वतंत्रपणे वापर करण्यापेक्षा ते अधिक प्रभावी ठरते, हा सर्वांत मोठा धडा होता. सहभागींनी केवळ माहिती आत्मसात केली नाही; त्या आधारे कृती करण्यासाठी त्यांनी नाती जोडली आणि आत्मविश्वासही वाढवला. विशेषतः कीवमधील प्रत्यक्ष संवादातून हे घडले.

साध्या, स्पष्ट आणि व्यावहारिक मजकुराचे मूल्य किती मोठे असते, हेही आम्ही शिकलो. अमूर्त सिद्धांताऐवजी लगेच वापरता येणारी माहितीच आपल्या सर्वाधिक लक्षात राहिल्याचे सहभागी सातत्याने सांगत होते.

शेवटी, प्रकल्पासोबतच आमच्या संघाची क्षमता उभारण्यासाठी काम करताना आम्हाला पुन्हा जाणवले की लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कौशल्यांइतकीच संस्थेची तग धरण्याची क्षमताही महत्त्वाची आहे.

GV: आता पुढे काय? तुम्ही मिळवलेले ज्ञान आणि उभारलेली डिजिटल क्षमता भविष्यातील कामात आणि समुदायामध्ये कशी वापरणार?

YH: या प्रकल्पातील डिजिटल साधने, एखाद्या मुद्द्यासाठी समर्थन मिळवण्याच्या पाठपुराव्याच्या चौकटी आणि नागरी कृतीच्या नियोजनाची कौशल्ये यापुढे तरुणांसाठीचे कार्यक्रम आखताना कायम वापरण्याचा आमचा विचार आहे. हा एकदाच हाताळण्याचा विषय राहिलेला नाही; तो आता आमच्या कामाचा कायमस्वरूपी भाग आहे.

कीवमधील नेटवर्किंग कार्यक्रमातून तयार झालेले संबंध आम्हाला पुढेही जपायचे आणि वाढवायचे आहेत. एकदाच झालेल्या ओळखींचे रूपांतर सातत्याने सक्रिय असलेल्या समुदायात करायचे आहे.

संस्थेच्या पातळीवर, तग धरण्याची क्षमता आणि दीर्घकालीन क्षमता उभारणीबाबत आम्ही जे विकसित केले आहे, त्याचा वापर beYOUndच्या वाढीसोबत संस्था मजबूत करण्यासाठी करत आहोत. त्यामुळे यासारखे आणि भविष्यात आणखी मोठे प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही अधिक सक्षम होऊ.